भूगोल विभाग – भौगोलिक शैक्षणिक सहल – २०१८ -१९

दि.१२.०१.२०१९ रोजी भूगोल विषयाची शैक्षणिक सहल यवतमाळ पासून १५५ किमी अंतरावरील समुद्रसपाटीपासून ९४८ मी. उंची असलेल्या सालबर्डी येथे तसेच ऊर्ध्व वर्धा प्रकल्प, कौडण्यपूर व जहांगीरपूर येथे आयोजित करण्यात आली. सहलीला ६३ विद्यार्थी सहभागी झाले तसेच भूगोल विभागप्रमुख प्रा.डॉ.कल्पना देशमुख व प्रा.यशवंत राठोड यांनी सहलीचे आयोजन केले.
सालबर्डी हे मध्यप्रदेशातील बैतुल जिल्हा ता. आठनेर सातपुडा पर्वतराजीत वसलेले, एक निसर्ग सौंदर्याने नटलेले ठिकाण आहे येथे माडु नदीचा उगम होतो. तिला गुप्तगंगा नावानेही ओळखले जाते. सातपुड्याच्या वाळूच्या खडकात माडु या नदीने आपल्या युवा अवस्थेतील विविध भूआकार – धबधबे, धावत्या, रांजणखळगे निर्माण केले आहेत. मोसमानुसार बदलणाऱ्या पाण्याच्या पातळीमुळे नदी खननाची अनेक भू-वैशिष्ट्ये येथे पहावयास मिळतात. पावसाच्या पाण्याने होणारे रासायनिक विदारण तसेच वृक्षांच्या मुळांपासून होणाऱ्या जैविक विदारणाची अनेक उदाहरणे प्रत्यक्ष पहावयास मिळाल्याने भौगोलिक अध्ययन साध्य झाले.
उर्ध्व वर्धा प्रकल्प हा अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात येतो.नल व दमयंती या दोन नावाच्या नद्यांवरून त्याला नल-दमयंती प्रकल्प असे नाव पडले. अमरावती शहर, अमरावती व मोर्शी तालुका येथे या प्रकल्पातून पाणी पुरवठा होतो.
कौडण्यपूर हे वर्धा नदी काठी वसलेले एक ऐतिहासिक ठिकाण असून येथे विठ्ठल रुक्मिणीचे प्राचीन मंदिर आहे. ते अमरावती अंबादेवी स्थान पर्यंत भूअंतर्गत भागातून भुयार कोरलेले आहे असे म्हटले जाते. महाभारत काळात श्रीकृष्णाने रुक्मिणीचे येथून हरण केले अशी अख्यायिका आहे. तर जहागीरपूर हे प्राचीन शनी मंदिर आहे.
विद्यार्थ्यांनी या सर्व भौगोलिक ठिकाणांचा अभ्यास करून तेथील भूवैशिष्ट्ये समजून घेतली.  मृदा, हवामान कृषीपद्धती, व्यवसाय इत्यादींचा अभ्यास करून विविध नकाशे, आलेख, आकृत्यांचा वापर करून अहवाल भूगोल विभागाला सादर केला.

अवयवदान जागृतीचा सामाजिक उपक्रम

वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ आणि दाते महाविद्यालय भूगोल विभाग  यांच्या संयुक्त विद्यमाने अवयवदान जागृतीचा कार्यक्रम दि. १४ फेब्रुवारी २०१९ रोजी घेण्यात आला. आधुनिक काळात अवयवदान हे सर्वश्रेष्ठ दान समजले जाते. अवयवदानाने एक व्यक्ती कितीतरी व्यक्तींचे प्राण वाचवू शकते. डोळे, हृदय, यकृत, मूत्रपिंड इतकेच नव्हे तर त्वचेचे देखील रोपण करता येते असे प्रतिपादन वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या पॅथोलॉजी असोसिएट प्रोफेसर आणि श्री दत्त प्रासादिक शिक्षण प्रसारक मंडळ आर्णी च्या उपाध्यक्ष डॉ. किरण भारती यांनी केले. त्या बाबाजी दाते कला वाणिज्य महाविद्यालयाच्या भूगोल विभागाने आयोजित केलेल्या अवयवदान जागृती अभियान कार्यक्रमात मार्गदर्शन करीत होत्या.
अवयवदान कोणी करावे या संदर्भात मार्गदर्शन करतांना डॉ. अविनाश जानकर यांनी सुदृढ आणि निरोगी व्यक्तींनाच अवयव दानाची परवानगी असते अशी माहिती दिली. व्यसनी व एड्स सारखा आजार असलेल्या व्यक्तींनी अवयवदान करू नये, ते व्यर्थ जाते. या करिता तरुणांनी व्यसनांचा त्याग करून सुदृढ व निरोगी आयुष्य जगावे. कारण  सुदृढ व निरोगी तरुण तरुणीच देशाची खरी गुंतवणूक असतात असेही मत त्यांनी व्यक्त केले.
भूगोल अभ्यास मंडळाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दाते महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रेरणा पुराणिक आणि प्रमुख  अतिथी उपप्राचार्य डॉ.माणिक मेहरे उपस्थित  होत्या. अवयव दान जागृतीसंदर्भात पॅथोलॉजी असोसिएट प्रोफेसर डॉ.नीलिमा लोढा, डॉ.अविनाश जानकर, डॉ.दिवेकर ,श्री प्रमोद उबाळे यांनी बहुमोल मार्गदर्शन केले, कार्यक्रमाच्या आयोजक भूगोल विभाग प्रमुख प्रा. डॉ.कल्पना देशमुख यांनी  प्रास्ताविक  केले. संचलन राहुल सातपुते यांनी केले तर आभारप्रदर्शन शिवम पद्मावार यांनी केले. या कार्यक्रमाला महविद्यालयातील प्राध्यापक व  विद्यार्थी विद्यार्थीनिनी फार मोठ्या संखेने  प्रतिसाद दिला.

मातोश्री वृद्धाश्रमात श्रमदान

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयातील भूगोल विभागाच्या विद्यार्थ्यांनी दि. 29/12/2018 रोजी मातोश्री वृद्धाश्रमाला भेट दिली. श्रमदान करताना आश्रमातील खोल्या व परिसर स्वच्छ करून दिला. विद्यार्थ्यांनी गायलेल्या भाजनांना उत्तम प्रतिसाद देऊन वृद्धांनी गाणी सादर केली. आश्रमातील वृद्धांना आवश्यक वस्तूंचे वाटप केले.

 

 

‘तरुणांनी पौगंडावस्थेतील बदल स्वीकारावेत’ - डॉ. विजय कावलकर व डॉ. विजया कावलकर
पौगंडावस्थेतील मुलींचं भावविश्व, तारुण्यात प्रवेश करतांना होणारे शारीरिक आणि मानसिक बदल, भिन्नलिंगी  आकर्षण या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या समस्या आहेत. या अत्यंत महत्वाच्या आणि जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर प्रयासचे व संजीवनी हॉस्पिटलचे  संचालक डॉ. विजय कावलकर आणि डॉ.सौ. विजया कावलकर यांनी बाबाजी दाते महाविद्यालयाच्या विद्यार्थी, विद्यार्थिनींशी दि. १८ डिसेंबर २०१८ रोजी दिलखुलास संवाद साधला. बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या भूगोल विभागाने ‘ए.बी.सी. ऑफ अॅडोलसंस’  आणि ‘अॅडोलसंस: बायोलॉजीकल अँड फ़िजिओसोशल पर्स्पेक्टीव्ह’ या विषयावर दोन स्वतंत्र व्याख्यानांचे आयोजन केले. या कार्यक्रमात विविध चित्रफितींच्या माध्यमातून मुलींनी त्यांच्यावर  एखादा दुर्धर प्रसंग ओढवल्यास त्याचा सामना कसा करायचा, मुलामुलींमध्ये होणारे शारीरिक व मानसिक बदल कसे स्वीकारायचे, एकमेकांना समजून कसे घायचे या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या आयोजक भूगोल विभाग प्रमुख प्रा.डॉ. कल्पना देशमुख यांनी प्रास्ताविक करतांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने करण्यात येणारे हे प्रबोधन तरुणाईच्या कायम स्मरणात राहील असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्राचार्य सौ.प्रेरणा पुराणिक तर प्रमुख अतिथी म्हणूनसंगाबा अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा.विवेक देशमुख लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. यशवंत राठोड, संचलन कु. भक्ती पचगाडे व शिवम पदमावार यांनी तर आभार प्रदर्शन आकाश डहाके व कु.प्रांजली केळकर यांनी केले.

अवकाश निरीक्षण
दि. 14।12।18 ला सायंकाळी 6 ते 8 वाजता, श्री रवींद्र खराबे, अध्यक्ष स्काय वॉच ग्रुप यांच्या दुर्बिणीतून अवकाश निरीक्षण करताना भूगोल विभागाचे विद्यार्थी. चंद्राच्या पृष्टभागावरील विवरे, पर्वतरांगा, सपाट पृष्टभाग जो पृथ्वी वरून हरणाच्या आकाराचा भासतो, यांचे विद्यार्थ्यांनी निरीक्षण केले. तसेच पृथ्वीला 24 तासात 16 प्रदक्षिणा मारणाऱ्या स्पेस स्टेशन चे निरीक्षण करता आले.
मंगळ व शनी या ग्रहांचा अभ्यास आणि अवकाश निरीक्षण
दाते कॉलेज भूगोल अभ्यास मंडळ व स्काय वॉच ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळ व शनी या ग्रहांचा अभ्यास  आणि अवकाश निरीक्षण करण्यात आले. स्काय वॉच ग्रुप चे अध्यक्ष - श्री रवींद्र खराबे यांच्या निवस्थानी, बालाजी सोसायटी यवतमाळ येथे रात्री 7 ते 9 या कालावधीत निरीक्षण केले. प्रथम एक तास शनीचे निरीक्षण केले. पश्चिम क्षितिजावर शनीची रिंग स्पष्ट पणे पाहता आली. त्यानंतर शनी क्षितिजाखाली मावळला. पुढील एक तास मंगळ ग्रह, रोहिणी नक्षत्र, राशींचे तारकापुंज व काही ठळक ताऱ्यांचे निरीक्षण केले.

बोअरवेलच्या पाण्याची  तपासणी
दाते महाविद्यालयाच्या सभोवतालच्या परिसरातील, शिवाजी नगर, बालाजी सोसायटी, दहिवलकर ले आऊट, पाटबंधारे विभाग येथील निवडक घरांच्या बोअरवेलच्या पाण्याचे नमुने गोळा करताना व तपासणी अहवाल सादर करताना भूगोल विभागाचे विध्यार्थी.

बाबाजी दाते महाविद्यालयाच्या भूगोल विभागाने ‘सेव्ह रिव्हर सेव्ह लाइफ’ या विषयावर आयोजित केली कार्यशाळा
‘नद्यांचे अस्तित्व हाच मानवी सभ्यतेचा पाया आहे. त्यांना सतत वाहते ठेवणे आमचे कर्तव्य आहे हे समजून घेतले नाही तर मानवाचे अस्तित्व धोक्यात येणार आहे’ असा इशारा वाणिज्य महाविद्यालय ट्रस्ट यवतमाळ चे अध्यक्ष श्री विनायक दाते यांनी दिला. ते  बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या भूगोल विभागाने आयोजित केलेल्या ‘सेव्ह रिव्हर सेव्ह लाइफ’ या विषयावरील कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
‘नदी ही सजीव आहे, तिच्या प्रवाहावर मानवी जीवन अवलंबून आहे याची आम्हा सर्वांना कल्पना असूनही आम्ही आतापर्यंत नद्यांचे शोषण करण्याच्या  पद्धतींचाच  विकास केला. नद्यांचे पुनर्जीवन, पुनर्भरण याकडे आमचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. जलसंपत्ती गटाच्या अहवालानुसार सन २०३० पर्यंत देशात गरजेच्या तुलनेत निम्मेच पाणी असेल. भारताचा २५  टक्के भाग जलद गतीने वाळवंट बनत आहे. बारमाही वाहणाऱ्या नद्या मोसमी बनत आहेत तर छोट्या नद्या नष्ट होत आहेत. ३२ प्रमुख शहरांपैकी २२ शहरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो आहे.’ अशी मांडणी श्री प्रवीण व्ह्नाळे आणि नझीर सय्यद या नदी पाणलोट क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या  इशा फौन्डेशनच्या मार्गदर्शक तज्ञांनी केली.
या कार्यशाळेतील विचारमंथनातून नद्यांचे प्रवाह आटण्याची कारणीमिमांसा करताना विषयतज्ञांनी स्वतंत्र नियोजनाच्या अभावी नद्यांचे शोषण करण्याचा  ब्रीटीशांचा वारसा जपणे, नदी पाणलोट क्षेत्रातील बेसुमार जंगलतोड, भूजल संसाधनांचे शोषण, लोकसंख्येत चार पटीने झालेली वाढ, नद्यांचे प्रदूषण आणि हवामानातील बदल इत्यादी  मुद्द्यांचा उहापोह केला. नद्यांना प्रवाही करण्यासाठी भूगोल विषयाच्या विद्यार्थ्यांनी विविध सर्व्हेक्षणाच्या माध्यमातून शास्त्रीय पद्धतीने परिसरातील नद्यांच्या काठावर वृक्ष लागवड करणे, नदीच्या किमान पाण्यावर तिचा हक्क मान्य करण्या संदर्भात जल जागृती करणे, निर्मल पाणी निर्मल जीवन ही संकल्पना प्रत्यक्षात आणणे या मुद्द्यां आधारीत कृतीसंकाल्पाचा आराखडा तयार केल्यानंतर कार्यशाळेची सांगता करण्यात आली.
या कार्यशाळेला  महाविद्यालय विकास समितीचे  श्री विजय कासलिकर, वाणिज्य ट्रस्ट च्या सदस्य सौ. सुषमा दाते, प्राचार्य प्रेरणा पुराणिक, भूगोल विभाग प्रमुख डॉ. कल्पना देशमुख सिनेट सदस्य प्रा. विवेक देशमुख भूगोल अभ्यास मंडळाचे सदस्य व भूगोल विभागाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणावर  उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन मयुरी गोडसे हीने तर आभार प्रदर्शन राहुल सातपुते यांनी केले.

बाबाजी दाते महाविद्यालयात सिडबॉल निर्मिती कार्यशाळा

यवतमाळ : गेल्या पन्नास वर्षातील भीषण असा दुष्काळ यवतमाळ जिल्ह्याने यावर्षी अनुभवला आहे. त्यातच या वर्षी सिमेंट रस्त्यांच्या बांधकामामुळे रस्त्यांच्या बाजूची हजारो झाडे कापली गेली.भरपूर पावसासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड व संवर्धन अत्यावश्यक झाले आहे. या कार्यात सरकारी योजना शिवाय महाविद्यालयीन विद्यार्थि विद्यार्थिंनिंचा देखील  सहभाग असावा या उद्देशाने  येथील बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयच्या भूगोल विभागाने ‘सिडबॉलची निर्मिती’ या महत्वाच्या विषयावर दि. 08 सप्टें. 2018 रोजी एकदिवसीय कार्यशाळा आयोजित केली.

या कार्यशाळेला महाराष्ट्र शासन वनविभागाच्या आर.एफ.ओ श्रीमती कौशल  रंगारी तसेच भारती महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्र विभागाच्या प्रा.डों.रूपाली टेकाडे यांनी मार्गदर्शन केले.ज्या परिसरात वृक्ष लागवड करावयाची आहे त्या परिसरातील वस्त्रगाळ केलेली माती,शेणखत यांचे मिश्रणात उपयुक्त आणि औषधी वनस्पतींचे विशिष्ट पद्धतीने बिजरोपण करून त्याचे सिडबॉल तयार करण्यासंदर्भात या तज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले. दोन सत्रातील या कार्यशाळेत तयार करण्यात आलेले सिडबॉल ज्या ठिकाणी टाकले जातील त्या ठिकाणी ही रोपे उगवतील अशापद्धतीने तयार करण्याचे प्रशिक्षण सहभागी विद्यार्थ्यांना देण्यात आले.

कार्यक्रमाच्या आयोजक भूगोल विभाग प्रमुख प्रा. डों कल्पना देशमुख प्रशिक्षणार्थ्यांनी या शास्त्रीय पद्धतीने सिड बॉल तयार करून ते माळरानावर, ज्याठिकाणी झाडे नाहीत अशा ठिकाणी तसे बाहेरगावी जाणेयेणे करणार्‍या विद्यर्थ्यांनी बस मधून ठिकठिकाणी टाकावे असे आवाहन केले.अशापद्धतीने केलेले वृक्षरोपण हमखास यशस्वी होते असा ठाम विश्वास कार्यशाळेतील तज्ञांनी व्यक्त केला.या कार्यक्रमाला बाबाजी दाते महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डों. माणिक मेहरे,भूगोल विभागाचे प्रा. यशवंत राठोड, चित्रा राऊत, प्रा. शैलजा वैद्य व इतर प्राध्यापक वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन कु. भक्ती पचगाडे हिने तर आभार प्रदर्शन   हितेश केळकर या विद्यार्थ्याने केले.

अंतराळातील ग्रहांविषयी सजग व्हा

बाबाजी दाते महाविद्यालयातील भूगोल अभ्यासमंडळाच्या उद्घाटन प्रसंगी खगोलशास्त्र अभ्यासकांचे आवाहन  ‘सूर्यमालेतील शनी व मंगळा सारखे ग्रह पृथ्वी पासून लक्षावधी की.मी. अंतरावर आहेत. आपल्या आयुष्यातील छोट्या मोठ्या घटनांवर त्यांचे अनिष्ट परिणाम होत नसतात’, हे वैज्ञानिक सत्य खागोलोशास्त्राचे अभ्यासक श्री रवींद्र खराबे यांनी व्यक्त केले. श्री खराबे बाबाजी दाते कला आणी वाणिज्य महाविद्यालयाच्या भूगोल अभ्यास मंडळाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. चंद्र आणि सूर्याची ग्रहणे हा सावल्यांचा खेळ असून तो पृथ्वी आणी चंद्राच्या परिभ्रमणामुळे होतो. ग्रहणाबद्दल लोकांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्यासाठी  भूगोलाच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले. याप्रसंगी बाबाजी दाते महाविद्यालयातील भूगोल अभ्यास मंडळाने सूर्यमालेची अभ्यासपूर्ण माहिती देणारा स्लाईड शो आयोजित केला होता.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना भूगोल विभागप्रमुख प्रा डॉ. कल्पना देशमुख यांनी ‘भूगोल हा केवळ चार भिंतींमध्ये शिकविण्याचा विषय नसून त्याची व्याप्ती आणी आवाका मोठा आहे’ असे मत व्यक्त केले. त्यांनी भूगोल विभागाद्वारे वर्षभरात आयोजित केल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी भूगोल अभ्यास मंडळाच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. अभ्यास मंडळाचे अध्यक्षपदी राहुल सातपुते, उपाध्यक्षपदी शिवम पद्म्मावार, सचिव सायली मानतूटे आणी १२ सदस्यांची निवड करण्यात आली.

या कार्यक्रमाचे उद्घाटक वाणिज्य न्यासचे उपाध्यक्ष श्री सतीश फाटक होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रेरणा पुराणिक यांनी भूषवले तर प्रमुख अतिथी उपप्राचार्य प्रा. डॉ.माणिक मेहरे उपस्थित होत्या. या कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी प्रा. यशवंत राठोड, प्रा.चित्रा राउत, प्रा.शैलजा वैद्य व अभ्यास मंडळाचे पदाधिकारी यांनी प्रयत्न केले. या कार्यक्रमाला भूगोल विषयाच्या विद्यार्थी विद्यार्थिनिंनी मोठ्या संखेने उपस्थित राहून उस्फुर्त प्रतिसाद दिला.

Top