बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ 

Babaji Datey Kala & Vanijya Mahavidyalaya, Yavatmal

(वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ ट्रस्ट रजि. क्र. ई-३२ द्वारा संचालित)

NAAC Accredited B++ Grade with CGPA 2.82

संगीत विभाग – गीतरामायणाच्या महाविद्यालयीन  स्पर्धेचे  आयोजन

विशुद्ध विद्यालय ट्रस्ट व बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गीतरामायणाच्या महाविद्यालयीन  स्पर्धेचे  आयोजन. 22 जानेवारी रोजी अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीवरील रामलला प्राणप्रतिष्ठा व मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने भारतभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांचा भाग म्हणून यवतमाळातील विशुद्ध विद्यालय ट्रस्ट व बाबाजी दाते कला आणि वाणिज्य  महाविद्यालयाच्या वतीने गीत रामायण स्पर्धेचे  आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा  महाविद्यालयातील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात दिनांक ११/०१/२०२४ गुरुवार रोजी संपन्न झाली.
या स्पर्धेत यवतमाळतल्या विविध महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते. ग. दि. माडगूळकर लिखित व सुधीर फडके ( बाबूजी) यांनी संगीतबद्ध केलेल्या गीत रामायणातील कोणतेही एक गाणे स्पर्धकांना गावयाचे होते. स्पर्धेचा प्रारंभ  प्रा. डॉ. स्वाती जोशी व प्रा. दत्तात्रय जोशी यांनी म्हटलेल्या श्रीरामांच्या आरतीने झाला. या कार्यक्रमाला विशुद्ध संस्थेचे अध्यक्ष विनायक दाते, सचिव विजय कासलीकर, सदस्य सुषमा दाते व बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वर्षा ध. कुळकर्णी यावेळी प्रामुख्याने मंचावर उपस्थित होत्या.
स्पर्धेचे संचलन बाबाजी दाते कला आणि वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय  संगीत विभागातील प्रा. स्वाती जोशी  यांनी केले. स्पर्धकांना  चंद्रकांत राठोड यांनी संवादिनीवर साथ केली तर सचिन वालगुंजे यांनी तबलासंगत केली.
या स्पर्धेत प्रथम  क्रमांक -  आशिष शर्मा, बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ, द्वितीय क्रमांक - भक्ती जोशी, आदर्श अध्यापन महाविद्यालय, यवतमाळ, तृतीय क्रमांक - तनुश्री ढोरे, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, यवतमाळ, उत्तेजनार्थ क्रमांक - गार्गी राऊळकर, नानाकिबाई कनिष्ठ महाविद्यालय, यवतमाळ. यांना प्राप्त झाला.  स्पर्धेचे परीक्षण प्रा. रुद्रकुमार रामटेके व प्रा. प्रशांत गुगीलवार यांनी केले. शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. जयश्री चापोरकर यांनी मानले.
स्पर्धेच्या यशस्वितेसाठी प्रा. डॉ. प्रशांत बागडे, प्रा. दत्तात्रय जोशी,  प्रा. स्वाती जोशी, प्रा. जयश्री चापोरकर, प्रा. डॉ. वैशाली मेश्राम, रविजीत गावंडे, डॉ. माणिक मेहरे, पंकज उमरतकर, अश्विनी देशमुख, आशिष यादव यांचे सहकार्य लाभले. याप्रसंगी स्पर्धकांचे पालक आणि महाविद्यालयातील प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज राष्ट्रवंदना

21 नोव्हेंबर 2022 रोजी अभ्यासक्रमावर आधारित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज - राष्ट्रवंदना यावर माजी विदयार्थीनी डॉ सौ मनिषा पोहनकर देशमुख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच सं.गा.बा. अमरावती विद्यापीठ आचार्य पदवी मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

संगीत अभ्यास मंडळाचे उदघाटन

दि.21सप्टेंबर 2022 रोजी संगीत विभागात सरस्वतीपूजन व संगीत अभ्यास मंडळाचे उद्घाटन अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. श्री विनोद तलांडे यांच्या हस्ते करण्यात आले. अभ्यास मंडळातील सदस्यांचा सत्कार घेण्यात आला. तसेच याच दिवशी पं भातखंडे व पं पलूस्कर पुण्यतिथीचा कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये विभागातील विध्यार्थ्यांनी सादरीकरण केले.

'राष्ट्रीय मतदार दिन' या निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक

दि.25 जानेवारी 2022रोजी संगीत विभागाचा विद्यार्थी श्री दादाजी किनकर याचा 'राष्ट्रीय मतदार दिन' या निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

संगीत अभ्यास मंडळाचे उदघाटन

दि. 24 सप्टेंबर 2021 रोजी संगीत विभागात सरस्वती पूजन व संगीत अभ्यास मंडळाच्या उदघाटनाचा कार्यक्रम महाविद्यालयाचे ग्रंथपाल श्री विजय दीक्षित यांच्या हस्ते संपन्न झाला. निवड झालेल्या संगीत अभ्यास मंडळाच्या कार्यकारिणीतील सदस्यांचा सत्कार करण्यात आला. याच दिवशी माजी विदयार्थी श्री हरीश चव्हाण यांनी संगीत या विषयाबद्दल मार्गदर्शन केले. तसेच त्यांचा विभागातर्फे सत्कार करण्यात आला.

दाते कॉलेजचे प्रा. प्रशांत झीबल बागडे यांना आचार्य पदवी(Ph.D.) प्रदान

वाणिज्य महाविद्यालय न्यास द्वारा संचालित बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयातील (दाते कॉलेज) संगीत विभागातील प्रा. प्रशांत झीबल बागडे यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने नुकतीच आचार्य पदवी(Ph.D.) प्रदान केली आहे. त्यांच्या संशोधनाचा विषय ‘’पं. वी. ना. भातखंडे क्रमिक पुस्तक मालिकेतील संग्रहित घरंदाज निवडक बंदिशींचे सांगीतिक दृष्ट्या चिकित्सक अध्ययन” हा होता. प्रा. प्रशांत बागडे हे दाते कॉलेजचे माजी विद्यार्थी असून गेल्या १० वर्षापासून बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयात सहा. प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत. त्यांना या आचार्य पदवी करिता स्वर्गीय पं. मनोहर कासलीकर तसेच खामगाव येथील डॉ. हरिभाऊ खंडारे यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रा. प्रशांत बागडे यांना आचार्य पदवी प्राप्त झाल्याबद्दल वाणिज्य न्यासाचे अध्यक्ष श्री. विनायक दाते, उपाध्यक्ष श्री सतीश फाटक व न्यासाचे सन्माननीय सदस्य, उपप्राचार्य व सर्व प्राध्यापक यांच्या द्वारे अभिनंदन व सत्कार करण्यात आला.

दाते कॉलेजमध्ये संगीत विषयाचे online वर्ग

कोरोनाच्या साथीमुळे महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासाचे अतिशय नुकसान होत आहे. ते टाळण्यासाठी बाबाजी दाते कला आणि वाणिज्य या महाविद्यालयाच्या  संगीत  विभागाने विद्यार्थ्यांकरिता Zoom Online Classes दि. १८/०४/२०२० पासून  सुरू केलेले आहेत. या अभ्यासवर्गात विद्यार्थ्यांना संगीत विषयाच्या विविध पैलूंवर मार्गदर्शन केले जाते.
प्रा डॉ वर्षा कुलकर्णी, प्रा डॉ माणिक मेहेरे, प्रा स्नेहल डहाळे, प्रा दत्तात्रय जोशी व प्रा प्रशांत बागडे हे संगीताच्या विविध अंगांवर विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन करीत आहेत. विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचे खुप स्वागत केले आहे.


अभिनंदन प्रवीण अजमिरे, संगीत या विषयात सर्वप्रथम

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ शुक्रवार दि. २० डिसेंबर २०१९ रोजी संपन्न झाला. बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचा वांग्मय स्नातकचा विद्यार्थी अभिनंदन प्रवीण अजमिरे याला स्व. प्रभाकर नवसालकर रौप्यपदक आणि श्री. यादवराव केशवराव अंधारे स्मृती रोख पारितोषिक देऊन मा. राज्यपाल श्री. भगतसिंग कोश्यारी यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले. संगीत या विषयातही तो सर्वप्रथम आला आहे.


नवरात्र उत्सव

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या संगीत विभागातील विद्यार्थ्यांनी दिनांक १६-१०-२०१८ रोजी नवरात्र उत्सव साजरा केला. या वेळी विद्यार्थ्यांनी भजन, भक्तीगीत, जोगवा, गोंधळ आदी गीतप्रकाराद्वारे आपली कला सादर केली. यात संगीत विभागातील सर्व प्राध्यापकही सहभागी झाले होते.


पं. विष्णू नारायण भातखंडे व पं. विष्णू दिगंबर पलुस्कर पुण्यतिथी कार्यक्रम

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय संगीत विभागाच्या वतीने पं. भातखंडे व पं. पलुस्कर यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम दिनांक २१/०९/२०१८ रोजी संगीत विभागात पार पडला. संगीताच्या आधुनिक युगातील महान पंडित व संगीत संशोधक ज्यांनी संगीत कलेला समाजात सन्मानाचे स्थान प्राप्त करून दिले व संगीत घरा-घरात पोचविण्याचे कार्य केले त्या महान विभूतींचे नांव पं. विष्णू नारायण भातखंडे व पं. विष्णू दिगंबर पलुस्कर या संगीतातील क्रांतिकारी युग पुरूषांची आज संगीत विभागात पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी  संगीत विभाग प्रमुख प्रा. डॉ. वर्षा कुळकर्णी होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन तसेच विष्णूद्वय गीत विद्यार्थ्यांनी   सादर केले.  कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ. स्नेहल डहाळे यांनी केले तसेच कार्यक्रमाचे संचलन प्रा. दत्तात्रय जोशी यांनी केले. संगीत विभागातील विद्यार्थांनी शास्त्रीय गायन व वादन प्रस्तुत केले. त्या मध्ये अभिनन्दन अजमिरे, कु. भक्ती जोशी, कु दर्शना दांडेकर, कु. साक्षी जाधव, शुभम चांभारे, वंदन राउत  हितेश केळकर, यश पंधरे, जीशान मेश्राम, कु साक्षी जाधव, काजल ढाकणे, उदय जाधव, योगेश तरोणे, निहाल चव्हाण, करणसिंग पवार या विद्यार्थांनी शास्त्रीय संगीतातील रागांचे सादरीकरण केले  तसेच संगीत विभाग प्रमुख डॉ. वर्षा कुळकर्णी, प्रा. डॉ माणिक मेहरे, प्रा. डॉ. स्नेहल डहाळे व प्रा. दत्तात्रय जोशी यांनीही आपले गायन प्रस्तुत करून आदरांजली वाहिली . तबलावादक श्री. ताराचंद पिंपळघरे यांनी तबल्याची उत्तम साथ दिली. कु. सुरभी राजनेकर या विद्यार्थीनीने आभार प्रदर्शन केले. या सर्व कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळाला व कार्यक्रमाची सांगता झाली.