बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ 

Babaji Datey Kala & Vanijya Mahavidyalaya, Yavatmal

(वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ ट्रस्ट रजि. क्र. ई-३२ द्वारा संचालित)

NAAC Accredited B++ Grade with CGPA 2.82

NCC – एन.सी.सी. विभागातील सीनियर अंडर ऑफिसर कॅडेट शुभम काशिनाथ तिजारे पोलीस अधिकारी म्हणून नियुक्त.

दाते महाविद्यालयातील एन.सी.सी. विभागातील सिनिअर अंडर ऑफिसर शुभम काशिनाथ तिजारे यांनी दिनांक १ डिसेंबर २०२५ रोजी आपल्या अथक परिश्रमाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची एकाच वेळी अधिकारी पदाच्या दोन परीक्षा (PSI) पोलीस उपनिरीक्षक तसेच ट्रेझरी विभागाची अकाउंट ऑफिसर ही परीक्षा पास करून महाविद्यालयाच्या सन्मानात भर घातलेली आहे, करिता महाविद्यालयाच्या वतीने वाणिज्य न्यासाचे सन्माननीय अध्यक्ष श्री विनायक दाते तसेच महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉ. राजेश सिंगरू, शुभमचे मार्गदर्शक एन.सी.सी. ऑफिसर कॅप्टन प्रशांत बागडे, उपप्राचार्य डॉ. ताराचंद कंठाळे, विशुद्ध संस्थेचे सचिव विजय कासलीकर यांनी महाविद्यालयाच्या वतीने शुभमचे पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान केला व पुढील ट्रेनिंग करिता तसेच भावी आयुष्याकरिता खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमाला वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते.

राष्ट्रीय छात्र सेना स्थापना दिवस

दाते महविद्यालयात एन. सी. सी. स्थापना दिनानिमित्त विद्यार्थांना "सी" प्रमाणपत्र वितरण सोहळा संपन्न

स्थानिक बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथील एनसीसी विभागाच्या वतीने दि. 15/07/2025 रोजी राष्ट्रीय छात्र सेना स्थापना दिवसाचे औचीत्य साधून महाविद्यालयाच्या सावरकर सभागृहामध्ये एन. सी. सी. "सी" प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश सिंगरू तसेच या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून वाणिज्य न्यास संस्थेचे अध्यक्ष श्री. विनायक दाते तसेच ४७ महाराष्ट्र एनसीसी बटालियन चे प्रशासकीय अधिकारी मेजर रमेश भट आवर्जून उपस्थित होते. तसेच महाविद्यालायातील एनसीसी युनिटचे माजी कॅडेट्स सध्या भारतीय सैन्य दलात नायक म्हणून कार्यरत असलेले शिपाई मयूर सोनारखन व शिपाई महेश पाथोडे यांच्या व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

एनसीसीच्या तिसऱ्या वर्षातील कॅडेट्सनी सलग तीन वर्ष एनसीसीच्या माध्यमातून महाविद्यालयीन जीवनातील सैनिकी  प्रशिक्षण एनसीसी ऑफिसर कॅप्टन प्रशांत झि. बागडे तसेच ४७ महाराष्ट्र एनसीसी बटालियनचे कमान अधिकारी कर्नल अनुप नायर यांच्या मार्गदर्शनात पूर्ण कले व २०२५ च्या "सी" प्रमाणपत्र परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना एनसीसी स्थापना दिवसाचे  औचित्य साधून "सी" प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. महाविद्यालयाच्या एनसीसी युनिट मधील १० मुली व १५ मुले एकूण २५ विदयार्थी  "सी" प्रमाणपत्र परीक्षा विशेष  प्राविण्य मिळवून उत्तीर्ण झालीत.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा. श्री. विनायक दाते यांनी विद्यार्थ्यांना केलेल्या आपल्या मार्गदर्शनात एन. सी. सी. प्रशिक्षण हे महाविद्यालयीन तरुणांसाठी एक मौल्यवान अनुभव आहे, जे त्यांना एक चांगला नागरिक बनण्यास मदत करते शिवाय एन सी सी प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, आत्मविश्वास आणि देशाप्रती समर्पणाची भावना वाढते हे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवूनच आद्य संस्थापक स्व.बाबाजी दाते यांनी संस्थेत एन सी सी सुरू केले. त्याला खऱ्या अर्थाने आपण सगळे न्याय देत आहात असे प्रतिपादन केले व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून यावर्षीपासून महाविद्यालयात एक उत्कृष्ट विद्यार्थी व उत्कृष्ट विद्यार्थिनी  पुरस्कार देण्यात येईल असे जाहीर केले.  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश सिंगरू यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात एन. सी. सी. ही भारतीय सशस्त्र दलांची युवा शाखा असून, जी देशातील तरुणांना शिस्त, नेतृत्व आणि देशभक्तीची भावना वाढवण्यासाठी प्रशिक्षण देते. एन सी सी मध्ये विद्यार्थ्यांना सैनिकी प्रशिक्षण, कवायत, शस्त्र प्रशिक्षण आणि इतर सामाजिक कार्यांमध्ये सहभागी होण्याची मोठी संधी उपलब्ध करून देते या संधीचं विद्यार्थ्यांनी सोनं करावं असे प्रतिपादन केले. सोबतच ४७ महाराष्ट्र एनसीसी बटालियन चे प्रशासकीय अधिकारी मेजर रमेश भट यांनी पास झालेल्या विद्यार्थ्यांना स्वप्न बघायचे असतील तर ते मोठे बघा, भारतीय सैन्य दलात केवळ शिपाई न होता सैन्य अधिकारी बनण्यासाठी चिकाटीने प्रयत्न करा असे आवाहन केले व आपले सैन्य दलातील काही अनुभव विद्यार्थ्यांसमोर संवादरूपी विषद केले.

या कार्यक्रमाच्या निमित्त वेगवेगळ्या राष्ट्रीय स्तरावरील कॅम्पमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे मान्यवरांद्वारे सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचलन प्रा. डॉ. रवीजीत गावंडे यांनी केले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.  ताराचंद कंठाळे, सचिन जयस्वाल, डॉ. अमोल राऊत, डॉ. सचिन तेलखेडे, प्रा. दत्तात्रय जोशी, डॉ. वैशाली मेश्राम, श्री. व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता एनसीसी गीताने करण्यात आली.

स्व. बाबाजी दाते यांच्या समाधी स्थळावर स्वच्छता अभियान उपक्रम संपन्न

स्थानिक बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयातील एन.सी.सी. युनिट च्या वतीने गुरुवार दिनांक २७ मार्च २०२५ रोजी स्वर्गीय बाबाजी दाते यांच्या समाधी स्थळावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. महाविद्यालयापासून सकाळी ६.३० वाजता बाबाजींच्या टेकडी पर्यंत धाव शर्यत आयोजित करून एन.सी.सी.च्या विद्यार्थ्यांना बाबाजीच्या निसर्गरम्य टेकडीची माहिती देण्यात आली व सुरुवातीला त्याच निसर्गरम्य परिसरात विद्यार्थ्यांचे व्यायाम व योगासने घेऊन नंतर समाधी स्थळावरील स्वच्छता मोहिमेला सुरुवात करण्यात आली. याशिवाय विद्यार्थ्यांना बाबाजी दातेंच्या समाधीस्थळ परिसरात विशुद्ध संस्थेद्वारे सुरू असलेल्या गोसेवेच्या सामाजिक उपक्रमाची माहिती सुद्धा विद्यार्थ्यांना देण्यात आली. टेकडीच्या जवळच वास्तव्यास असलेला व महाविद्यालयातील एन.सी.सी.च्या युनिट मधून भारतीय नौदलात (lndian Navy) मध्ये नियुक्त झालेला माजी कॅडेट अवधूत चव्हाण यांनी स्वतः बांधलेल्या व बाबाजी टेकडी जवळच असलेल्या त्यांच्या नवीन वास्तूला एनसीसी विद्यार्थ्यांनी भेट देऊन एन.सी.सी. कॅडेट द्वारा अवधूतला भेटवस्तू देण्यात आली. या भेटीदरम्यान अवधूत चव्हाण यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून आपले अनुभव कथन केले व विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्यासाठी मार्गदर्शन केले.
या स्वच्छता मोहिमेमध्ये महाविद्यालयातील एन.सी.सी.च्या अनेक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. हा उपक्रम महाविद्यालयाच्या एन.सी.सी. युनिटचे प्रमुख प्रा. कॅप्टन प्रशांत बागडे यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आला. स्वच्छतेनंतर सर्व विद्यार्थ्यांना अल्पोहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

भव्य रक्तदान शिबिर

दाते महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना (एन. सी. सी.) विभाग, एन. एस. एस. विभाग व महाविद्यालयाच्या ९८ च्या माजी विद्यार्थी बॅच यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक १५ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन वाणिज्य न्यास संस्थेचे अध्यक्ष मा. विनायक दाते यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला विशुद्ध संस्थेचे सचिव विजयराव कासलीकर, प्राचार्य डॉ. राजेंद्र क्षीरसागर, एन.सी.सी. अधिकारी कॅप्टन प्रशांत बागडे, एन.एस.एस. अधिकारी डॉ. वैशाली मेश्राम डॉ. सचिन जयस्वाल तसेच ९८ च्या बॅच चे उमेश कपिले, सागर भास्करवार, नितीन कोल्हे, सुनील भुसार, उपस्थित होते. या रक्तदान शिबिरामध्ये जवळपास १५० रक्तदात्यांनी रक्तदान केले. त्यामध्ये महाविद्यालयाच्या एन.सी.सी. विभागातील अधिकाऱ्या सहित २५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ९८ च्या बॅच चे माजी विद्यार्थी हिंदी प्रसारक महाविद्यालयाचे प्रा. सचिन जयस्वाल यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेश हांडे, सचिन एब्बडवार, अश्विनी पांडे, सुजाता गावंडे, ममता मुक्कावार, शतरूपा फुंड, निलेश देशपांडे, अमोल जीपकाटे, डॉ. प्रकाश कांबळे यांनी परिश्रम घेतले.

रक्तदान करा, जीवनदान द्या!

एन.सी.सी. दिनाचे औचित्य साधून दाते महाविद्यालयातील एन.सी.सी. चे विद्यार्थी ४७ महाराष्ट्र एन.सी.सी. बटालियन येथील रक्तदान शिबिरात सहभागी.

२४ नोव्हेंबर २०२४ रोजी ४७ महाराष्ट्र एनसीसी बटालियन गोधनी रोड येथे झालेल्या रक्तदान शिबिरात महाविद्यालयातील एन.सी.सी. विभागातील ३० कॅडेटस् नी रक्तदान केले. एन.सी.सी. दिनाचे औचित्य साधून ४७ महाराष्ट्र एन.सी.सी. बटालियन गोधनी रोड येथे सर्व महाविद्यालयातील एनसीसी युनिट एकत्रित येऊन एक मोठे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात जवळपास १५० विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत रक्तदान केले. यामध्ये महाविद्यालयातील एन.सी.सी. चे सीनियर अंडर ऑफिसर अनिकेत ठाकरे, जुनीअर अंडर ऑफिसर हर्षद गायकवाड, कॅडेट दर्शन गुरणुले, कॅडेट नशिकेत राऊत, कॅडेट आर्यन निलेवड, कॅडेट यश टेकाम, कॅडेट गजेश्वर जाधव, कॅडेट अक्षय शेंद्रे असे एकूण ३० विद्यार्थी सहभागी झाले.

एन.सी.सी.च्या या पुनीत उपक्रमामुळे अनेक रुग्णांना नवजीवन मिळणार आहे. रक्तदान हा सर्वात मोठा दान आहे. या शिबिरातून मिळालेल्या रक्ताचा उपयोग गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांच्या जीवनात प्रकाश घालण्यासाठी केला जाईल. असे शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी कर्नल अनुप नायर आणि मेडिकल टीमचे प्रमुख डॉ. खवले यांनी संबोधित केले.

महा मॉरेथॉन स्पर्धा

दि. ११ ऑगस्ट २०२४ रोजी, यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन विभाग द्वारा आयोजित महा मॉरेथॉन २० किलोमीटर स्पर्धेत बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या एनसीसी युनिटचा  कॅडेट करण निलेवाड यांना प्रथम पुरस्कार तसेच कॅडेट जगदीश पवार यांना द्वितीय पुरस्कार प्राप्त झाला. या स्पर्धेमध्ये महाविद्यालतील एनसीसी युनिटचे एकूण 25 विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेसाठी सर्व कॅडेटला ४७ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. यवतमाळ चे कमांडिंग ऑफिसर कर्नल अनुप नायर व एनसीसी अधिकारी कॅप्टन प्रशांत बागडे यांचे मार्गदर्शन लाभले. एन.सी.सी. विद्यार्थ्यांच्या या यशाकरिता महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. प्रदीप दरवरे तसेच संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष मा. विनायक दाते व व्यवस्थापन मंडळ यांनी शुभेच्छा देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.